जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा संपन्न

पंकज हिरुळकर जिल्हा प्रतिनिधी
अंजनगाव सुर्जी : जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर अंजनगाव सुर्जी येथील माळीपुरा परिसरातील मोठी मढी संस्थान येथे पंतजली योग समिती, लोकजागर परिवार, सेवादीप मल्टी फाउंडेशन व मोठी मढी महिला योग वर्ग माळीपुरा सुर्जी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या जवळपास ५० कर्तृत्ववान महिलांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. हा सत्कार संगीता गोविंद मेण यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमातून पंतजली योग समिती व लोकजागर परिवाराने समाजात समानतेचा संदेश देत कोणताही भेदभाव न करता सर्व स्तरातील महिलांचा सन्मान केला. भांडी घासून उदरनिर्वाह करणाऱ्या महिला, सफाई कामगार, बचत गटातील महिला, सामाजिक कार्यकर्त्या, उद्योजिका तसेच दिनदुबळ्या, गरीब, एकल, वृद्ध व निराधार महिलांचाही विशेष सन्मान करण्यात आला. त्यामुळे कार्यक्रमाला एक सामाजिक व प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले.
यावेळी सत्कार प्राप्त झालेल्या काही सफाई कामगार महिलांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, आजपर्यंत अनेक संस्था व संघटनांनी महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केले; मात्र आमच्यासारख्या सफाई कामगार महिलांचा सन्मान कोणीही केला नव्हता. पंतजली योग समिती व लोकजागर परिवाराने आमचा सन्मान करून आम्हाला समाजात मानाचे स्थान दिले आहे. याबद्दल त्यांनी आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या शकुंतलाबाई चांदुरकर (ह.भ.प.), रमाबाई पराये (कामगार), निता मोगरे (सफाई कामगार), मिना दिलीप अंबुलकर (समाजसेविका), लता हरणे (जेष्ठ शिक्षिका), सुभद्रा काळे (जेष्ठ आरोग्य सेविका), उषा बोडखे (आशा वर्कर्स व CLF अध्यक्ष), मंजुषा लोळे (माजी नगराध्यक्ष), प्रियंका मालठाणे (उपनगराध्यक्ष), संगीता गोरडे, मिना बुंदेले (माजी आमदारांच्या धर्मपत्नी), ज्योति लवटे (आमदार गजानन लवटे यांच्या धर्मपत्नी), श्रद्धा दीदी (ओम शांती परिवार), हेमा लेंधे (भाजप शहराध्यक्ष), विद्या घडेकार (ग्रामीण अध्यक्ष), स्मिता विजेवर (नगरसेविका), लता बाळे (नगरसेविका), वर्षा बोबडे (सखी मंच), हर्षवती पवार (उद्योजिका), सुरेखा धमाले (भजन मंडळ) यांच्यासह अनेक महिलांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुंदर संचालन मंदा वानखडे (माजी शिक्षिका) यांनी केले. तसेच सविता सालोडे (नगरपालिका बचतगट शहर व्यवस्थापक), वैशाली टिपरे (CLF अध्यक्ष), शीतल अस्वार (अध्यक्ष), उज्वला लहाड (CLF अध्यक्ष), कल्पना खेरडे, वंदना नाथे (बचतगट अध्यक्ष), पुनम वानखडे (CRP), नलिनी अरबाळ (CRP), वैशाली नवले (योग शिक्षिका), शोभा थोरात (जेष्ठ शिक्षिका), राधा मोगरे (जेष्ठ सफाई कामगार) आदींचाही गौरव करण्यात आला.
तसेच शहानूर नदी स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घेणाऱ्या जयाताई हरणे, जयश्री झाडे, सुभद्राबाई काळे, शुभांगी पटेल, ममता गोबरे, वैशाली नवले, शोभा थोरात, अनु हिवरे, उज्वला लाडोळे, सारिका धामोळे, संगीता दुधे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला तहसीलदार पुष्पा दाबेराव, पोलिस अधिकारी काळे मॅडम, वैशाली गायगोले, डॉ. मेघा नालट, जयश्री मोरे (सखी मंच), जावरे मॅडम (समूह संघटिका) आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. काही मान्यवर कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नसले तरी त्यांनी शुभेच्छा पाठविल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय धारस्कर, नाना शिंदीजामेकर, देवानंद महल्ले, प्रशांत पवार, वासुदेव काळे, दीपक दानेज यांचे सहकार्य लाभले. तसेच भेलांडे सर, भास्करराव बोंद्रे, महादेव पेढेकर, गजानन सहारे, आनंद संगई, बंडु हंतोडकर तसेच पंतजली योग समिती व लोकजागर परिवारातील सदस्यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संगीता गोविंद मेण यांनी केले असून मोठी मढी महिला योग वर्ग, माळीपुरा सुर्जी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच अनेक पत्रकार बंधूंनी कार्यक्रमाला शुभेच्छा देत पाठिंबा दर्शविला. महिला सन्मानाचा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.



