बीड
वेळास येथे ‘गणेशोत्सव अभियाना’अंतर्गत मोफत आरोग्य शिबीर संपन्न

वेळास येथे ‘गणेशोत्सव अभियाना’अंतर्गत मोफत आरोग्य शिबीर संपन्न
वेळास (संदेश घोलप):
श्रीवर्धन तालुक्यातील उपकेंद्र वेळास येथे ‘श्री गणपती गणेशोत्सव अभियान’ अंतर्गत भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये ग्रामस्थांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी, ब्लड शुगर तपासणी आणि NCD (असंसर्गजन्य आजार) स्क्रीनिंग करण्यात आले. यासोबतच शासनाच्या ‘आयुष्मान भारत योजने’अंतर्गत पात्र नागरिकांना मोफत कार्ड काढून देण्याची विशेष सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती.
या शिबीराला परिसरातील ज्येष्ठ नागरिक व तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आशा सेविका सौ. स्नेहा कल्पेश मुरकर यांनी विशेष पुढाकार घेऊन घराघरांत जनजागरण केले. तसेच आशा सेविका मृणाली काविणकर व सामिया पारकर यांनी शिबीरासाठी विशेष मेहनत घेतली.
या प्रसंगी आरोग्य सहाय्यक गोपीनाथ पाटील, आरोग्य सेवक राजेंद्र जाणवल, C.H.O. विठ्ठल चौधरी साहेब, गाव अध्यक्ष ऋतुराज शिलकर, समाजसेवक राजेश (राजू) तोंडलेकर आणि दीपक वाजे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागात राबवल्या गेलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून मनापासून कौतुक केले जात आहे.



