📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

मृत्यूनंतरही डोळ्यांतून जगू या; नांदेडमध्ये शनिवारी भव्य नेत्रदान जनजागृती रॅली

मृत्यूनंतरही डोळ्यांतून जगू या; नांदेडमध्ये शनिवारी भव्य नेत्रदान जनजागृती रॅली
—————————
*जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांसह लायन्स पदाधिकाऱ्यांची उपस्थिती*

नांदेड: *माणसाचे आयुष्य संपले तरी त्याच्या डोळ्यांतून दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश निर्माण होऊ शकतो. मृत्यूनंतरही एखाद्याला दृष्टी देण्याची ही मानवतेची अनोखी संधी अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लायन्स नेत्र रुग्णालय, नांदेड यांच्या वतीने राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त शनिवारी, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता भव्य नेत्रदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.*

‘राष्ट्रीय नेत्रदान जनजागृतीतून अंधत्वावर मात’ या व्यापक संकल्पनेतून आयोजित करण्यात येणारी ही रॅली जंगमवाडी येथील लायन्स नेत्र रुग्णालयातून सुरू होऊन टॉवर, जुना मोंढा येथे पोहोचणार आहे. नेत्रदानाचे महत्त्व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे, नेत्रदानाबाबत समाजात असलेले गैरसमज आणि भीती दूर करणे तसेच अधिकाधिक नागरिकांना नेत्रदानासाठी प्रेरित करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
या जनजागृती रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त महेश कुमार डोईफोडे तसेच लायन योगेशकुमार जयसवाल, प्रथम उपप्रांतपाल, प्रांत ३२३४ एच २ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

दि. २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा केला जात आहे. या कालावधीत विविध माध्यमांतून नेत्रदानाबाबत जनजागृती केली जाते. त्याचाच एक भाग म्हणून नांदेडमध्ये ही रॅली आयोजित करण्यात आली असून, नेत्रदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून मृत्यूनंतरही समाजासाठी योगदान देण्याची मानवतावादी भावना असल्याचा संदेश यातून दिला जाणार आहे.रॅलीमध्ये लायन्स नेत्र रुग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व इतर कर्मचारी, लायन्स क्लबचे पदाधिकारी आणि सदस्य तसेच लायन्स परिवारातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. हातात नेत्रदानाचे महत्त्व सांगणारे फलक घेऊन तसेच जनजागृतीपर घोषणांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये नेत्रदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण केले जाणार आहे.

‘मृत्यूनंतरही आपल्या डोळ्यांमधून दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश निर्माण होऊ शकतो’, हा या रॅलीचा भावनिक केंद्रबिंदू असणार आहे. अनेकांना नेत्रदानाची इच्छा असते; मात्र त्याबाबतची पुरेशी माहिती नसल्याने किंवा काही गैरसमजांमुळे ते पुढे येत नाहीत. अशा गैरसमजांना दूर करून नेत्रदानाची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी या उपक्रमातून प्रयत्न केला जाणार आहे.या रॅलीचे नियोजन लायन राजेश लोटिया (अध्यक्ष), लायन ॲड. प्रविण अग्रवाल (सचिव), लायन अरुणकुमार तोष्णीवाल (कोषाध्यक्ष), लायन गंगाप्रसाद तोष्णीवाल (उपाध्यक्ष), लायन शिरीष कासलीवाल (सहसचिव) तसेच कार्यकारिणी सदस्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नेत्रदानाच्या माध्यमातून मृत्यूनंतरही एखाद्याच्या जीवनात प्रकाश आणता येतो. त्यामुळे या सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमात नांदेडकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ‘नेत्रदान—महादान’ या संदेशाला बळ द्यावे आणि नेत्रदानाची जनचळवळ अधिक व्यापक करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन लायन्स नेत्र रुग्णालय, नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Back to top button