बीड
लिंबागणेश येथे महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC ( बस पास) कार्ड नोंदणी शिबिर

लिंबागणेश येथे महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC ( बस पास) कार्ड नोंदणी शिबिर
—
लिंबागणेश (दि.२२): राज्य परिवहन महामंडळाने एसटी प्रवासातील सवलतींसाठी डिजिटल स्मार्ट कार्ड प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला असून, “एनसीएमसी” (National Common Mobility Card) कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे आज, रविवार (दि.२२) रोजी महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलतीच्या दरात नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्या महामंडळाकडून महिलांना अर्धे तिकीट, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, तसेच स्वातंत्र्यसैनिक, राज्य पुरस्कार प्राप्त व्यक्ती, विद्यार्थी व दिव्यांग नागरिकांना विविध सवलती दिल्या जातात. मात्र या सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड आवश्यक करण्यात आले आहे.
कार्ड अनिवार्य झाल्याच्या चर्चेमुळे अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला व दिव्यांग व्यक्ती बसस्थानकांवर रांगा लावत असल्याचे चित्र दिसत आहे. ही धावपळ टाळण्यासाठी लिंबागणेश येथील मारोती मंदिरात सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
आवश्यक कागदपत्रे:
आधारकार्ड (मूळ प्रत + १ झेरॉक्स)
आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर
ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाचा पुरावा
या शिबिराचा लाभ घेऊन नागरिकांनी आपले एनसीएमसी कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन आयोजक पत्रकार हरिओम क्षीरसागर (जिल्हाध्यक्ष, युवा ग्रामीण पत्रकार संघ, बीड) यांनी केले आहे.
—
महिला व ज्येष्ठांनी लाभ घ्यावा; शिबिरामुळे वेळ वाचणार – डॉ. गणेश ढवळे
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून एनसीएमसी कार्ड सक्तीचे करण्यात आल्याने सवलतधारकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. उन्हातान्हात बसस्थानकांवर रांगा लावण्याची वेळ येत असून, गावोगावी अशा शिबिरांचे आयोजन झाल्यास नागरिकांची मोठी सोय होणार आहे. त्यामुळे महिला व ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. गणेश ढवळे यांनी केले आहे.



