बीड
खैर तस्करी प्रकरणावर वनविभागाचा ‘गोलमाल’; लाखांचे लाकूड अवघ्या ‘बारा हजारांत’ स्वाधीन!

खैर तस्करी प्रकरणावर वनविभागाचा ‘गोलमाल’; लाखांचे लाकूड अवघ्या ‘बारा हजारांत’ स्वाधीन!
- राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरदचंद्र पवार) गंभीर आरोप; दोषी अधिकाऱ्यांच्या सखोल चौकशीची मागणी
- रोहा वनविभाग आणि म्हसळा परिक्षेत्राच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; बड्या तस्करांना पाठीशी घालण्याचा संशय
रायगड (संदेश घोलप)
जिल्ह्यात वनविभागाने खैर लाकूड तस्करी विरोधात रात्रीच्या अंधारात मोठी कारवाई केल्याचा दावा केला असला, तरी ही कारवाई आता एका मोठ्या ‘घोटाळ्याच्या’ भोवऱ्यात सापडली आहे. कागदोपत्री दाखवलेला आकडा आणि प्रत्यक्षात जप्त केलेल्या लाकडाची किंमत यात जमीन-अस्मानाचा फरक असल्याचा पर्दाफाश झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाने याप्रकरणी आक्रमक भूमिका घेत वनविभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, संशयित अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
नक्की काय आहे प्रकरण? (प्रेस नोटमधील पोलखोल)
म्हसळा येथे १४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री मिळालेल्या खबऱ्याच्या बातमीनुसार, वनविभागाच्या पथकाने आंबेद-महाड रोडवर एका वाहनावर (टाटा योद्धा, क्रमांक MH 08 AP 4122) धडक कारवाई केली. या कारवाईत खैर सोलिप नग आणि खैर सोलिप किटा जप्त करण्यात आले.
परंतु, वनविभागाने जारी केलेल्या अधिकृत प्रेस नोटमधील आकडेवारी डोळे दीपवणारी आहे:
नग आणि मोजमाप: तब्बल २६२ नग खैर लाकूड जप्त करूनही त्याचे मोजमाप केवळ २.२४१ घनमीटर दाखवण्यात आले आहे.
किमतीचा खेळखंडोबा: लाखो रुपयांची बाजारातील किंमत असताना, या संपूर्ण खैराच्या लाकडाची किंमत केवळ १२,६८२ रुपये (१०,५९८ + २,०८४) एवढी नगण्य दाखवण्यात आली आहे!
बड्या तस्करांना पाठीशी घालण्याचा डाव? – अझहर धनसे
या संशयास्पद कारभारावर ताशेरे ओढत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्हा संघटक तथा श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष अझहर धनसे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट सवाल केला आहे की, “बाजारपेठेत खैराच्या लाकडाची विक्री किलोच्या व वाजवी दराने होत असताना, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणातील लाकडाची किंमत केवळ १२ हजार रुपये कशी काय दाखवली? हा सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यात फेकलेला धूळफेक असून, याद्वारे बड्या लाकूड तस्करांना पाठीशी घालण्याचा जाणीवपूर्वक आणि संगनमताने प्रयत्न सुरू आहे का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादीचा इशारा: चौकशी झालीच पाहिजे!
एकीकडे वनविभागाचे पथक तस्करांना पकडल्याचा आव आणत असले, तरी त्यांच्याच कागदोपत्री नोंदींमधील हा झोल कारवाईच्या पारदर्शकतेला काोठड्या दाखवणारा ठरत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल विभागीय चौकशी करून लाकूड तस्कर आणि त्यांना अभय देणाऱ्या खात्यांतर्गत अधिकाऱ्यांचे बुरखे टराटरा ओढले जावेत, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.
आता या गंभीर आरोपांनंतर रायगडचे वरिष्ठ वनधिकारी काय पावले उचलतात आणि दोषींवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे!



