बीड

प्रसारमाध्यमांच्या दणक्याने काझी संघाणी ग्रुपला नोटीस; राजकीय वरदहस्तांमुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ ! १३ कोटीचे बीड बसस्थानक गळती प्रकरण:- डॉ.गणेश ढवळे 

प्रसारमाध्यमांच्या दणक्याने काझी संघाणी ग्रुपला नोटीस; राजकीय वरदहस्तांमुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ ! १३ कोटीचे बीड बसस्थानक गळती प्रकरण:- डॉ.गणेश ढवळे
बीड (दि.१०): अवकाळी पावसात गळती लागलेल्या बीड मध्यवर्ती बसस्थानक प्रकरणी अखेर संबंधित कंत्राटदार काझी संघाणी ग्रुपला नोटीस बजावण्यात आली आहे. तब्बल १३ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या या बसस्थानकात उद्घाटनापूर्वीच पाणी गळती झाल्याचे व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बीडकरांमध्ये संतापाची लाट उसळली होती.
या प्रकरणावर विविध प्रसारमाध्यमांनी सातत्याने आवाज उठवल्यानंतर प्रशासनाला हालचाल करावी लागली. सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे तक्रार दाखल करून आंदोलनाचा इशारा दिला होता.
दरम्यान, राज्य परिवहन विभागाकडून सुरुवातीला कंत्राटदाराची पाठराखण करण्यात आली होती. छतावर साचलेला कचरा व धुळीमुळे पाइप चोकअप होऊन पाणी एसीपी पॅनलमध्ये साचल्याने गळती झाल्याचा लेखी खुलासा विभाग नियंत्रकांनी केला होता. तसेच काम प्रचलित तांत्रिक मानकांनुसार पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात असल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते.
मात्र, वाढत्या जनक्षोभ आणि माध्यमांच्या दबावामुळे अखेर एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला नोटीस बजावत गळतीची जबाबदारी निश्चित केली आहे. “मध्यंतरी झालेली पाणी गळती ही कंत्राटदाराची चूक असून, आपल्याविरुद्ध दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये?” असा सवाल नोटीसमध्ये उपस्थित करण्यात आला आहे. तसेच काम पूर्ण करून इमारत महामंडळाकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ का?
दरम्यान, ६४ लाख रुपयांच्या हायटेक सिग्नल कोसळण्याच्या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचवेळी १३ कोटींच्या बसस्थानकातील निकृष्ट कामाबाबत अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
“कोणाच्या राजकीय वरदहस्तांमुळे कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे? बाहेरील कंत्राटदारांवर कारवाई आणि स्थानिक सगेसोयऱ्यांना मोकळीक का?” असा थेट सवाल डॉ. गणेश ढवळे यांनी उपस्थित केला आहे.
निष्कर्ष
बीड बसस्थानक गळती प्रकरणी नोटीस देऊन कारवाईची सुरुवात झाली असली तरी दोषींवर ठोस कारवाई व गुन्हा नोंद होणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Back to top button