बीड

अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून सेवा केंद्रातून डोळस श्रद्धा व मनशांतीचे काम – चंद्रकांत मोरे 

अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून
सेवा केंद्रातून डोळस श्रद्धा व मनशांतीचे काम – चंद्रकांत मोरे
गेवराईत सत्संग मेळावा उत्साहात संपन्न
गेवराई ( प्रतिनिधी ) श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातून अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून डोळस श्रद्धा सेवाभाव या माध्यमातून मनशांती करण्याचे काम भारतासह 21 देशात केले जात असून हा सेवा मार्ग घराघरात, मनामनात पोहोचवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन गुरुवर्य पुत्र चंद्रकांत ( दादासाहेब ) मोरे यांनी गेवराई येथे आयोजित सत्संग मेळाव्यात केले.
 अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्रंबकेश्वर जिल्हा नाशिक यांच्या वतीने सुप्रजन्यवृष्टी व राष्ट्र कल्याणार्थ श्री रुद्र लिंगार्चन सोहळा गेवराई येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित करण्यात आला होता. या सत्संग मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी चिंतेश्वर संस्थांचे मठाधिपती दिलीप महाराज घोगे यांचे प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, युवा नेते रोहित पंडित, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या गेवराई तालुका केंद्र निरीक्षक प्रतिनिधी सौ स्वरूपाताई रोहित पंडित, सौ गीता भाभी पवार, युवा नेते रणवीर पंडित आदींनी गुरुपुत्र चंद्रकांत ( दादासाहेब ) मोरे यांचे पुष्पहार करून स्वागत केले.
   पुढे बोलताना गुरुपुत्र चंद्रकांत (दादासाहेब) मोरे म्हणाले की, श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या ग्राम अभियानांतर्गत 18 विभागाच्या माध्यमातून 20 टक्के अध्यात्म आणि 80 टक्के सामाजिक उपक्रम राबविले जातात. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालून डोळस श्रद्धा, सेवाभाव यामधून मनःशांती प्रदान करण्याचे काम भारत देशासह जगातील 21 देशांमध्ये हजारो सेवा केंद्राच्या माध्यमातून चालू आहे. या सेवेचा कोट्यावधी भाविक अनुभव घेत आहेत. हरवलेली मनःशांती पुनर्जिवीत करण्यासाठी श्री स्वामी समर्थ सेवा घराघरात, मनामनात पोहोचवणे ही खरी स्वामींची सेवा आहे असेही ते म्हणाले.
 या कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन, छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांचे पूजन करुन झाले.
याप्रसंगी गेवराई तालुक्यातील श्री स्वामी समर्थ भाविकांसह सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले. शहरासह तालुक्यातील सर्व साप्ताहिक केंद्रातील महिला, पुरुष, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या गेवराई तालुका केंद्र निरीक्षक प्रतिनिधी सौ स्वरूपाताई रोहित पंडित यांच्यासह त्यांच्या सहकारी सेवाकरांनी परिश्रम घेतले.
Back to top button