बीड

गेवराई तालुक्यातील तपेनिमगाव येथे अवैध वाळू उपसा करताना तरुण गोदावरीत बुडाला

गेवराई तालुक्यातील तपेनिमगाव येथे अवैध वाळू उपसा करताना तरुण गोदावरीत बुडाला

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पुन्हा एकदा जीवितहानीचा प्रश्न ऐरणीवर

गेवराई, दि. २५ (प्रतिनिधी) – गेवराई तालुक्यातील तपे निमगाव परिसरात गोदावरी नदीपात्रातून केणीच्या साह्याने सुरू असलेल्या अवैध वाळू उपशादरम्यान एका तरुणाचा पाण्यात बुडून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.२४ मे) दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तपेनिमगाव येथील गोदावरी नदीपात्रात कोणतेही अधिकृत वाळू टेंडर नसताना मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. केणीच्या सहाय्याने नदीपात्रातून वाळू काढण्याचे काम सुरू असताना संबंधित तरुणाचा पाण्यात तोल जाऊन तो खोल पाण्यात बुडाल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. नदीपात्रात खुलेआम सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाकडे महसूल व पोलिस प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. “अधिकृत परवानगी नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असताना प्रशासन कारवाई का करत नाही?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. विशेष म्हणजे, या घटनेत एका तरुणाचा जीव धोक्यात आला असूनही अद्याप संबंधित वाळू माफियांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, घटनास्थळी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी झाली असून शोध पथकांकडून नदीपात्रात शोधकार्य सुरू आहे. बुडालेल्या तरुणाची ओळख आणि घटनेचे नेमके कारण अधिकृतरीत्या समोर येणे अद्याप बाकी आहे.

Back to top button