नंदागौळात गेल्या ७ महिन्यात झालेल्या दोन घरफोड्यांचा तपास पोलिसांना लागेना !

नंदागौळात गेल्या ७ महिन्यात झालेल्या दोन घरफोड्यांचा तपास पोलिसांना लागेना !
गावातील नागरिक भयभीत ; पोलिसांच्या तपासावर व भुमिकेवर नागरिक असमाधानी
पोलीस अधीक्षक नवनीत कावत साहेबांनी लक्ष देऊन या प्रकरणात लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी
चोरी प्रकरणाचा तपास पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर लावून पिडीत कुटुंबाला न्याय द्यावा – सुंदर गित्ते
परळी(प्रतिनिधी)परळी तालुक्यातील मौजे नंदागौळ येथे मागील ७ महिन्यात २ जबरी चोऱ्या व घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले असून,आमच्या चोरीचा तपास लावा,आम्हाला न्याय द्या म्हणून ज्यांच्या घरी चोरी झाले ते कुटुंबीय वारंवार पोलीस स्टेशनच्या चकरा मारून न्याय मागत आहेत,पंरतु परळी ग्रामीण पोलिसांकडून कोणतेही उत्तर दिले जात नाही,त्यामुळे पिडीत कुटुंबीय हतबल झाले आहेत आणि जर ७ – ७ महिने पोलीसाकडून चोरीच्या प्रकरणाचा तपास लागत नसेल तर न्याय मागायचा तरी कुणाकडे असा प्रश्न त्या कुटुंबाला पडला आहे,त्यामुळे या दोन्ही चोरी प्रकरणाचा तपास लवकरात लवकर लाऊन या कुटुंबाना न्याय द्यावा अशी मागणी नंदागौळचे सरपंच सुंदर गित्ते यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
याबबत सविस्तर वृत्त कि,परळी तालुक्यातील नंदागौळ येथील शेतकरी परमेश्वर रामभाऊ गित्ते यांच्या घरी २५ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १.०० च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरफोडून सुमारे ४ तोळे सोने ज्याचे आजचे बाजारमूल्य ६ लाख रुपये आहे व १ लाख रुपयांच्या चांदीच्या दागिन्यांची चोरी करण्यात आली आजच्या बाजारमुल्या नुसार एकूण ७ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून हडप केला,त्याची सौ.मंडाबाई परमेश्वर गित्ते यांनी दिलेल्या फिर्यादी वरून परळी ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत अज्ञात आरोपी विरोधात गु.र.न.४१३/२०२५ कलम ३३१(४),३०५(a) भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला,फिर्यादी वारंवार पोलिसांच्या संपर्कात राहिले,तपास सुरु आहे म्हणून सांगण्यात आले परंतु मागील ७ महिन्यात पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही,ह्या गुन्ह्याचा तपास लागलेला नसतानाच नंदागौळ येथील देवानंद नवनाथ गित्ते यांच्या घरी २५ मार्च २०२६ रोजी रात्री १० ते २६ मार्च २०२६ रोजी पहाटे २.३५ दरम्यान चोरीची घटना घडली त्यात,त्यांचा मिर्चीचा व्यवसाय असल्याने लोकांचे पैसे देण्यासाठी घरात आणून ठेवलेले नगदी स्वरूपातील ५ लाख रुपये तसेच १.५ तोळे सोने व काही चांदीचे दागिने असे रोख रक्कम व आजच्या बाजार भावानुसार दागिन्यांचे मिळून सुमारे ०७ लक्ष रुपयांची चोरी झाली,त्याच दिवशी गावातील नामदेव बब्रुवान गित्ते यांच्या घरातील २ तोळे सोने व काही चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले,या बाबत देवानंद्र नवनाथ गित्ते यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात आरोपी विरोधात परळी ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गु.र.न.०१४०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४) व ३०५ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे,पहिल्या चोरी प्रकरणाचा तपास पोलिसांना लागला नसल्याने चोरट्यांनी तशाच प्रकारची चोरी परत नंदागौळ गावामध्ये केली आणि पोलीस प्रशासनाकडे वारंवार भेटून त्यावर काहीच होत नसल्याने पिडीत कुटुंब हतबल झाले आहे,त्यामुळे पोलीस अधीक्षक मा.नवनीत कावत साहेब,उपविभागीय पोलीस अधिकारी शिंदे साहेब व परळी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सय्यद साहेब यांनी या प्रकरणात लक्ष देऊन लवकरात लवकर तपास करण्याची मागणी सरपंच सुंदर गित्ते यांनी केली आहे.
नंदागौळचे बीट अंमलदार एकही दिवस पेट्रोलिंग करत नाही मग फक्त अवैध धंद्यांना अभय देण्याचे काम करतात का ?
नंदागौळ गावासाठी असलेले बीट अंमलदार श्री टोले हे स्वतःचे कर्तव्य व्यवस्थित पार पाडत नाहीत,ते आता पर्यंत एकदाही पेट्रोलिंग साठी गावात आले नाहीत,त्यांनी दररोज पेट्रोलिंग करणे आवश्यक असताना नंदागौळ मध्ये चोरीच्या घटना घडत असताना ते पेट्रोलिंग करत नाहीत किंवा गावातील तसेच त्यांच्या अखत्यारीत असलेल्या क्षेत्रातील अवैध धंदे बंद न करता त्यांना अर्थपूर्ण रितीने पाठीशी घालतात,त्यामुळे अवैध धंदे करणारे व्यक्ती व चोरांचे मनोधैर्य वाढले आहे,पोलीस स्टेशनला गेलेल्या व्यक्तीला शिवीगाळ करणे,अरेरावी करणे असे प्रकार केल्याने यापूर्वीच गावातील एका तरुणाने पोलीस अधीक्षक साहेबाकडे त्यांच्या विरोधात तक्रार दिली आहे तरीही त्यावर काहीही कारवाई करण्यात आली नाही,त्यामुळे पोलीस अधीक्षक नवनीत कावत साहेब व परळी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सय्यद साहेब यांनी मागील ७ महिन्यात नंदागौळ येथे झालेल्या चोरीच्या घटनेचा तपास त्वरित लावावाच परंतु त्यासोबत नंदागौळ साठी असलेले बीट अंमलदार श्री टोले हे त्यांच्याकडे असलेल्या गावात काय कार्य करतात,अवैध धंदे वाल्यांना कसे पाठीशी घालतात, सामान्य नागरीका सोबत कशी अरेरावी करतात,गावात पेट्रोलिंग का करत नाहीत ? गावातील अनेक तक्रारदारांना त्यांच्या बाबत वेगवेगळे अनुभव आलेले आहेत,याबाबत योग्य ते नियोजन करण्याची मागणी नंदागौळ येथील ग्रामस्थांनी केली आहे.


