जामखेडमध्ये आ.रोहित पवार मित्रपरिवाराकडून ईदच्या शुभेच्छा

जामखेडमध्ये आ.रोहित पवार मित्रपरिवाराकडून ईदच्या शुभेच्छा
रमजान ईद हा मानवतेचे मूल्य जपणारा पवित्र सण – शहाजी राळेभात
जामखेड प्रतिनिधी : रमजान ईदच्या पवित्र पर्वानिमित्त कर्जत-जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित (दादा) पवार मित्रपरिवार, जामखेड शहर यांच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन तसेच अलिंगन देत ईदच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
दरम्यान, जामखेड शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामूहिक नमाज अदा केली आणि सर्वांसाठी सुख-शांतीची प्रार्थना केली. शनिवार सकाळी नऊ वाजता झालेल्या मुख्य नमाज पठणासाठी हजारोंच्या संख्येने मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते. यावेळी मौलाना मुफ्ती अब्दुल अलीम पठाण यांनी नमाजाचे पठण केले. यावेळी समाजात बंधुभाव, ऐक्य आणि सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश देण्यात आला. तसेच विश्वशांती आणि माणुसकीसाठी प्रार्थना करण्यात आली. ईदगाह मैदानावर राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडले.
नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन तसेच अलिंगन देत ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते शहाजी राळेभात यांनी सांगितले की,रमजान ईद हा मानवतेचे मूल्य जपणारा पवित्र सण आहे. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित (दादा) पवार यांच्या प्रेरणेतून समाजात एकोपा आणि बंधुभाव दृढ करण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. ईदच्या निमित्ताने एकमेकांना आलिंगन देत दिल्या जाणाऱ्या शुभेच्छा या केवळ परंपरा नसून, त्या समाजातील भिंती पाडून माणुसकी जपण्याचे कार्य करतात.अशा सणांमुळे समाजात सौहार्द, विश्वास आणि परस्पर आदर अधिक दृढ होतो. आपण सर्वांनी धर्म-पंथाच्या पलीकडे जाऊन एकोप्याची आणि शांततेची वाट चालत राहणे हीच खरी ईदची शिकवण आहे.समाजात प्रेम, शांती आणि बंधुभाव कायम राहो, हीच या पवित्र दिवसाच्या निमित्ताने मनापासून प्रार्थना.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष वैजिनाथ पोले,नगरसेवक राजेंद्र गोरे, प्रा. संजय वराट, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात,युवा नेते प्रा. कुंडल राळेभात,अभय शिंगवी,माजी ग्रामपंचायत सदस्य इस्माईल सय्यद, प्रविण उगले, डॉ. कैलास हजारे, सुनील जावळे, हरीभाऊ आजबे, संदीप आण्णा गायकवाड, अशोक घुमरे, प्रा. राहुल आहिरे, सचिन शिंदे, बजरंग डूचे आदी मान्यवर तसेच मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खर्डा चौक, जयहिंद चौक तसेच मशिदी व दर्गाह परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.



