बीड

पंकजाताई मुंडे यांनी परळीतून प्रस्तावित केलेली महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना’मंजूर : अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांची घोषणा

पंकजाताई मुंडे यांनी परळीतून प्रस्तावित केलेली महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना’मंजूर : अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांची घोषणा

_पशुसंवर्धनातून आर्थिक उन्नतीचा मार्ग प्रशस्त करणारा हा अर्थसंकल्प -पंकजाताई मुंडे_

परळी वैजनाथ: प्रतिनिधी…
राज्याच्या अर्थसंकल्पीय भाषणात ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी परळी वैजनाथ येथील महापशुधन एक्सपोत प्रस्तावित केलेल्या ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजने’ला राज्य सरकारने मंजुरी दिली असून याबाबतची घोषणा मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली आहे.
ग्रामीण भागात पशुपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन तसेच इतर पशुधन आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील युवक, महिला आणि शेतकरी यांना पशुधन व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक व तांत्रिक सहाय्य उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच लोकनेते गोपीनाथ मुंडे  यांच्या नावाने सुरू असलेल्या ‘गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजने’ ची व्याप्ती वाढवून शेतमजुरांनाही या सुरक्षा कवचाखाली आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अपघाती प्रसंगी शेतमजुरांच्या कुटुंबालाही आर्थिक मदत मिळणार आहे.
याशिवाय महिला गोपालक, कुक्कुटपालक आणि शेळीपालक यांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविण्याची घोषणा करण्यात आली आहे. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी मांडलेल्या या उपक्रमांमुळे ग्रामीण भागात पशुधन उद्योगाला चालना मिळून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पशुसंवर्धन विभागाच्या वतीने ना. पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकारातून परळी वैजनाथ येथे झालेल्या देशपातळीवरील महा पशुधन एक्स्पोच्या समारंभात पंकजाताई मुंडे यांच्या कामाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले होते. तसेच येणाऱ्या काळात पंकजाताई मुंडे यांच्याकडून पशुसंवर्धन विभागाच्या ज्या ज्या योजना व प्रस्ताव दिले जातील ते सर्व मंजूर करून  भरघोस निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता. या अनुषंगानेच या अर्थसंकल्पात पंकजाताई मुंडे यांनी प्रस्तावित केलेली महत्त्वकांक्षी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच पशुसंवर्धन विभागासाठीही भरघोस निधी आणि प्रोत्साहनपर अनेक योजनांची  घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. पशुसंवर्धनातून ग्रामीण भागाची आर्थिक गती वाढविण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाबद्दल ना पंकजाताई मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्राताई पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत.
••••

Back to top button