नमो श्रीराम नामाचा अखंड जयघोष : महाजनवाडी ते अयोध्याधाम 75 दिवसीय पायी रथयात्रेचा आज होणार प्रारंभ – विष्णुदास महाराज सुरवसे

नमो श्रीराम नामाचा अखंड जयघोष :
महाजनवाडी ते अयोध्याधाम 75 दिवसीय पायी रथयात्रेचा आज होणार प्रारंभ – विष्णुदास महाराज सुरवसे
बीड (प्रतिनिधी):- श्रीराम नवमीच्या पावन पर्वनिमित्त श्रीक्षेत्र महाजनवाडी,ता.जि.बीड येथून श्रीक्षेत्र अयोध्याधाम येथे जाणारी 75 दिवसीय, सुमारे 2000 किलोमीटर अंतराची पायी ‘नमो श्रीराम नाम रथयात्रा दिंडी सोहळा’ भक्तिभाव, त्याग, सेवा व संकल्पशक्तीचे जिवंत प्रतीक ठरत आहे. ही ऐतिहासिक व अध्यात्मिक रथयात्रा रविवार, दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी श्री हनुमान मंदिर, श्रीक्षेत्र महाजनवाडी येथून सकाळी 9 वा. मंगल प्रारंभ होणार आहे. या रथयात्रेची गुरुवार, दिनांक 26 मार्च 2026 रोजी, श्रीराम नवमीच्या पावन दिवशी श्रीक्षेत्र अयोध्याधाम येथे सांगता होणार आहे. ही यात्रा म्हणजे केवळ पायांची चाल नव्हे, ही अंत:करणाची ओढ, ही यात्रा म्हणजे केवळ रथाचा प्रवास नव्हे ही आहे श्रीराम नामाची अखंड धारा अशी माहिती भाजपा अध्यात्मिक आघाडीचे बीड जिल्हा संयोजक विष्णुदासजी महाराज यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
ही दिंडी व रथयात्रा श्रीरामभक्त विष्णुदासजी महाराज सुरवसे यांच्या पावन आयोजनातून व दृढ संकल्पनेतून साकार होत आहे. केवळ प्रवास नव्हे, तर ही 75 दिवसांची चालती तपश्चर्या, चालता यज्ञ, चालता नामसंकीर्तन महोत्सव आहे. पायी चालताना प्रत्येक पाऊल रामनामात न्हाऊन निघणार आहे. रथयात्रेच्या वाटेवरील गावोगावी श्रीराम भक्तिरसाचा सुगंध दरवळणार आहे. या नमो श्रीराम नाम रथयात्रेमध्ये श्रीराम नामाचा अखंड नामजप, सायंकाळी मुक्कामाच्या ठिकाणी हनुमान मंदिरामध्ये भावार्थ रामायण कथा संपन्न होणार आहे. सामाजिक एकोपा, व्यसनमुक्ती, सदाचार, राष्ट्रप्रेम, संस्कृती संवर्धन व सनातन मूल्यांचा संदेश या यात्रेच्या माध्यमातून जनमानसात रुजवला जाणार आहे.
महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या तीन राज्यांमधून पायी प्रवास करत, ही रथायात्रा दिंडी अनेक संतभूमी, तीर्थक्षेत्रे व ग्रामदेवता यांच्या चरणी नतमस्तक होत अयोध्येकडे मार्गस्थ होणार आहे. या 75 दिवसीय कालावधीत श्रीराम भक्त प्रत्यक्ष सहभाग घेणार असून, लाखो श्रीराम भक्त व भाविकांचे आशीर्वाद व शुभेच्छा रथयात्रेस लाभणार आहेत. तसेच गुरुवार, दिनांक 26 मार्च 2026 रोजी म्हणजेच श्रीराम नवमी दिवशी श्रीक्षेत्र अयोध्याधाम येथे भव्यदिव्य व ऐतिहासिक ‘लक्ष्मण शक्ती मुक्तोत्सव सोहळा संपन्न होणार आहे. या वेळी श्रीराम रामलल्ला दर्शन, भव्य श्रीराम नाम शोभायात्रा, संत-महंतांचे प्रवचन व विशेष धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. अशी माहिती भाजपा अध्यात्मिक आघाडीचे बीड जिल्हा संयोजक विष्णुदास महाराज सुरवसे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.



