बीड
टिपरे, सोंग आणि भोलोबा गीत स्पर्धेसाठी नोंदणी करावी – आ. विजयसिंह पंडित

टिपरे, सोंग आणि भोलोबा गीत स्पर्धेसाठी नोंदणी करावी – आ. विजयसिंह पंडित
=============
गेवराईत होणार टिपरे महोत्सवाचे जल्लोषात आयोजन
गेवराई, दि.१८ (प्रतिनिधी) ः- टिपरे आणि सोंग या लोककलेचे गेवराई शहराशी अतुट नाते आहे, या लोककलेची परंपरा जोपासण्याचे काम जाणीवपूर्वक आ. विजयसिंह पंडित यांच्या माध्यमातून सुरु आहे. यावर्षीच्या टिपरे महोत्सवाचे आयोजन बुधवार, दि.३० जुलै रोजी होणार आहे. टिपरे, सोंग आणि भोलोबा गीत स्पर्धेसाठी संघ आणि वैयक्तिक कलाकारांनी आपली नोंदणी करण्याचे आवाहन आ. विजयसिंह पंडित यांनी केले आहे. महोत्सवाच्या पुर्व तयारीसाठी परिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. सुभाष निकम यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक संपन्न झाली. यामध्ये स्पर्धेची नियमावली, पारितोषिक यांसह इतर बाबींवर चर्चा झाली.
सालाबादा प्रमाणे याहीवर्षी शारदा प्रतिष्ठान, गेवराई यांच्यावतीने गेवराई विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार विजयसिंह पंडित यांच्या माध्यमातून बुधवार, दि.३० जुलै रोजी सायं. ६ वाजता बाजारतळ, गेवराई येथे भव्य टिपरे महोत्सवाचे आयोजन गेवराई शहरात करण्यात येणार आहे. लोककलेचा आगळावेगळा दुर्मिळ ठेवा जतन करून संस्कृती संवर्धन करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. लोककलेला राजाश्रय देऊन ही परंपरा नव्या पिढीमध्ये रुजावी म्हणून भरघोस बक्षिसांचा वर्षाव यासाठी केला जातो. टिपरे महोत्सवाच्या आयोजना संदर्भात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी लोकशाहीरांना अभिवादन केल्यानंतर गढी येथे झालेल्या दुर्दैवी अपघतातील मृत तरुणांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. ज्येष्ठ कलावंत ॲड. सुभाष निकम यांचा सत्कारही या बैठकीत करण्यात आला. बैठकीला शाहीर विलास सोनवणे, ज्येष्ठ कलावंत प्रशांत रुईकर, विष्णूपंत खेत्रे, संघ प्रतिनिधी महेश मोटे, दत्ता दाभाडे, अक्षय पवार यांच्यासह आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.
नागपंचमीच्या निमित्ताने टिपरे, सोंग आणि भोलोबा गीत या कला अविष्कारांचे स्पर्धात्मक स्वरुपात आयोजन केले जाते. टिपरे महोत्सवात प्रत्यक्ष टिपरे आणि सोंग याचे सादरीकरण होते तर भोलोबा गीत स्पर्धेसाठी व्हिडीओ चित्रीकरण करून त्या माध्यमातून त्याचे परिक्षण करण्यात येते. यावर्षी नागमंत्री थाळा वादन या कला अविष्काराचा समावेश महोत्सवात करण्यात आला असून ही कला जोपासणाऱ्या मान्यवर कलावंतांचा सत्कार शारदा प्रतिष्ठानकडून केला जाणार आहे. या महोत्सवात प्रथम संघास रु.३३,३३३, द्वितीय संघास रु.२२,२२२ व तृतीय संघास रु.११,१११ रोख व दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी रु.५,५५५ यासह सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. उत्कृष्ट पात्र सजावट (टिपरे) यासाठी प्रथम ५,०००, द्वितीय ३,०००, तृतीय २,००० व दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी रु.१,००० यासह अशी वैयक्तिक पारितोषिके दिली जाणार आहेत. याशिवाय पंचमीनिमित्ताने सोंग घेण्याची परंपरा असल्याने उत्कृष्ट सोंग घेणाऱ्या कलावंतांना प्रथम ५,०००, द्वितीय ३,०००, तृतीय २,००० व दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी रु.१,५०० यासह तर उत्कृष्ट वाद्य वादकास प्रथम ३,०००, द्वितीय २,०००, तृतीय १,५०० रोख व दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी रु.१,००० यासह पारितोषिक व सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. यावर्षी लक्षवेधी कला सादरीकरण करणाऱ्या सहा कलावंतांचा रोख रक्कमेसह सन्मानचिन्ह देवून गौरव होणार आहे. त्याचबरोबर भोलोबा (फेर) गीत स्पर्धेसाठी प्रथम रु.५,०००, द्वितीय रु.३,०००, तृतीय रु.२,००० आणि उत्तेजनार्थ प्रत्येकी रु.१,००० दोन विजेत्या संघांना सन्मानचिन्हासह देऊन गौरविण्यात येणार आहे. भरघोस बक्षिसांचे वाटप यानिमित्ताने करण्यात येणार आहे. हा महोत्सव कलेच्या व परंपरेच्या प्रोत्साहनासाठी आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शारदा प्रतिष्ठानच्यावतीने आ. विजयसिंह पंडित यांनी दिली.
आ. विजयसिंह पंडित यांच्या पुढाकारातून सुरु झालेल्या टिपरे महोत्सवामुळे गेवराई शहरातील कलावंतांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शहरातील गल्लोगल्ली टिपरे संघ सराव करताना दिसत आहे. टिपरे महोत्सवासाठी प्रा.बाबु वादे – ७५८८६३५११२, किशोर सोनवणे – ९४२३३५२४०१ आणि ओम मोटे – ९४२०८७४५७८ या क्रमांकावर नोंदणी करण्याचे आवाहन शारदा प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.



