📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या घोर दुर्लक्षामुळे ‘दांडा-कुरवडे’ सागरी पूल अजूनही लालफितीत; जनतेचा वेळ, पैसा अन् इंधनाची रोज होते राखरांगोळी!

लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या घोर दुर्लक्षामुळे ‘दांडा-कुरवडे’ सागरी पूल अजूनही लालफितीत; जनतेचा वेळ, पैसा अन् इंधनाची रोज होते राखरांगोळी!
​दोन वर्षांनंतरही केवळ कागदी घोडे आणि पोकळ आश्वासने; सत्ताधारी आणि आमदार-खासदारांच्या मौनावर श्रीवर्धनकरांचा संताप, तीव्र आंदोलनाचा इशारा!
​श्रीवर्धन (संदेश घोलप ) :
खाडीच्या या पारवरून त्या पार जायला अवघे १०० मीटरचे अंतर… पण पुलाअभावी नागरिक, पर्यटक आणि स्थानिक नागरिक, मच्छिमार, रुग्ण, विद्यार्थी तसेच व्यावसायिकांना तब्बल २० किलोमीटरचा जीवघेणा आणि वेळखाऊ फेरा मारावा लागत आहे! सरकारी अनास्था, प्रशासकीय दिरंगाई आणि लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणाचे ज्वलंत उदाहरण म्हणजे श्रीवर्धन तालुक्यातील अतिशय महत्त्वाकांक्षी मानला जाणारा ‘दांडा-कुरवडे सागरी पूल प्रकल्प’ गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकल्प पार धूळखात पडला आहे.
​पूर्वी याच खाडीमार्गे बोटीने अवघ्या १० मिनिटांत श्रीवर्धनच्या मुख्य बाजारपेठेत पोहोचणारे नागरिक आता ४० मिनिटांच्या खडतर प्रवासात आणि २० किलोमीटरच्या फेऱ्यात अडकत आहेत. “नेते येतात, सार्वजनिक कार्यक्रमांत आश्वासनांचे पुलाव शिजवतात आणि निघून जातात!” अशी तीव्र आणि संतापजनक प्रतिक्रिया सध्या संपूर्ण तालुक्यातून उमटत आहे.
​याच गंभीर मुद्द्यावर प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना जागे करण्यासाठी भाजप श्रीवर्धन तालुका मंडळ संयोजक अमृत अनंत शिगवण यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री मा. आदितीताई तटकरे यांना अधिकृत निवेदन पाठवून प्रशासकीय दिरंगाईवर तीव्र ताशेरे ओढले आहेत.
​दांडा व कुरवडे दरम्यानची खाडी केवळ १०० मीटरची आहे. येथे पूल झाल्यास ग्रामस्थ आणि पर्यटकांचा वेळ, पैसा आणि इंधनाची मोठी बचत होईल.
​ श्रीवर्धनचे सोमजाई मंदिर, हरिहरेश्वर (दक्षिण काशी), दिवेआगारचे सुवर्णगणेश मंदिर आणि कुरवडे येथील ऐतिहासिक अगस्ती गुहा या पर्यटनस्थळांना जोडणारा हा पूल रखडल्याने स्थानिक व्यावसायिक, बचत गट आणि मच्छीमारांचे मोठे नुकसान होत आहे.
सागरमाला प्रकल्पांतर्गत बाणकोट-वेश्वी तसेच इतर सागरी पुलांची कामे सुरू असताना, श्रीवर्धनच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा दांडा-कुरवडे पूलच लालफितीत का अडकवला आहे?
​या पुलामुळे रायगड-रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांतील दळणवळण अत्यंत सुलभ होऊन स्थानिक बाजारपेठ तेजीत येऊ शकते.
​सार्वजनिक बांधकाम विभागाणे “सर्व्हे करून भौगोलिक व आर्थिक पडताळणीबाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा करू” असे ठरवून दिलेले प्रशासकीय उत्तर दिले आहे. तर दुसरीकडे राजकीय पक्ष निवेदने देण्याचे दावे करत आहेत. “दोन वर्षांपासून सर्व्हे आणि पडताळणीच्या नावाखाली फक्त जनतेच्या डोळ्यात धूळ फेकली जात आहे,” असा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
​नेत्यांनी दोन वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले?
​प्रशासन प्रत्यक्ष कामाचे वेळापत्रक कधी जाहीर करणार?
​“जर प्रशासनाने त्वरित कागदी घोड्यांच्या पुढे जाऊन पुलाचे काम सुरू केले नाही, तर लोकप्रतिनिधींना तालुक्यात जाब विचारला जाईल आणि रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल!”असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
Back to top button