बीड

पेट्रोल-डिझेलचा पुरवठा तात्काळ सुरळीत करा, कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; अनिल बोर्डे यांची मागणी

पेट्रोल-डिझेलचा पुरवठा तात्काळ सुरळीत करा, कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; अनिल बोर्डे यांची मागणी
===================
गेवराई (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्याबाबत मोठी अनिश्चितता निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी पंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक पाहायला मिळत आहेत. इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेल चालकांकडून जाणीवपूर्वक पुरवठा बंद ठेवून कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, शासनाने याप्रकरणी तात्काळ लक्ष देऊन पुरवठा सुरळीत करावा आणि साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा गेवराई ग्राहक मार्गदर्शन केंद्र प्रमुख अनिल बोर्डे यांनी केली आहे.बीड जिल्ह्यात अचानकपणे उद्भवलेल्या या इंधन टंचाईमुळे शेतकरी, नोकरदार आणि व्यापारी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. दरवाढ होणार असल्याच्या शक्यतेने काही पेट्रोल पंप चालकांनी साठेबाजी सुरू केली असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. पंपांवर लांबच लांब रांगा लागल्या असून, अनेक ठिकाणी इंधन मिळत नसल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.या संदर्भात बोलताना अनिल बोर्डे म्हणाले की, “इंधन ही अत्यावश्यक सेवा आहे. केवळ नफा कमावण्यासाठी किंवा दरवाढीचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना वेठीस धरणे अत्यंत चुकीचे आहे. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचे चित्र आहे. शासनाने आणि जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. ज्या पंपांवर पुरेसा साठा असतानाही ग्राहकांना इंधन नाकारले जात आहे, अशांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांचे परवाने रद्द करावेत.”इंधनाअभावी वाहतूक व्यवस्था कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे. पुरवठा खंडित झाल्याने ग्राहकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन काही ठिकाणी अव्वाच्या सव्वा दराने विक्री होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करून जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा नियमित करावा, अशी आग्रही मागणी ग्राहक पंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.
Back to top button