बीड

१३ कोटींच्या बसस्थानकाचा ‘अजब-गजब’ कारभार; दर्शनी भागात वाहतूक शाखा, झाडाला मीटर, RO ठप्प – प्रवाशांची कुचंबणा :- डॉ. गणेश ढवळे

१३ कोटींच्या बसस्थानकाचा ‘अजब-गजब’ कारभार; दर्शनी भागात वाहतूक शाखा, झाडाला मीटर, RO ठप्प – प्रवाशांची कुचंबणा
:- डॉ. गणेश ढवळे
बीड (दि.१४): १३ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या बीड बसस्थानकात गंभीर अनियमितता समोर येत असून ‘अजब-गजब’ कारभाराची चर्चा रंगली आहे. भव्यदिव्य इमारतीच्या दर्शनी भागातच जिल्हा वाहतूक शाखेची खोली, झाडाला बांधलेले व थकबाकी असलेले विद्युत मीटर, तसेच पिण्याच्या पाण्याची (RO) ठप्प व्यवस्था आणि सशुल्क शौचालयातील गैरसोयींमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच जिल्हा वाहतूक शाखेची छोटी खोली उभारण्यात आल्याने इमारतीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे बसस्थानकाच्या सौंदर्यावर परिणाम होत असून प्रवाशांच्या हालचालींनाही अडथळा निर्माण होत आहे. ही शाखा तत्काळ योग्य ठिकाणी स्थलांतरित करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, बसस्थानक परिसरात झाडाला बांधलेल्या विद्युत मीटरमुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बांधकाम काळात कंत्राटदाराने घेतलेले हे मीटर आजही उघड्यावर लटकलेल्या अवस्थेत असून त्यावर तब्बल ३७ हजार रुपयांची थकबाकी आहे. उघड्यावर पडलेले फ्युज आणि वायरिंग प्रवाशांसाठी धोकादायक ठरत असून कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता आहे. तरीही संबंधितांवर कारवाई न झाल्याने महावितरणच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
याशिवाय, प्रवाशांसाठी असलेली पिण्याच्या पाण्याची (RO) सुविधा ठप्प असून ती केवळ शोभेची वस्तू ठरली आहे. सशुल्क शौचालयाची अवस्था देखील अत्यंत दयनीय असून दुर्गंधी, अस्वच्छता आणि कर्मचाऱ्यांकडून होणारे गैरवर्तन यामुळे प्रवाशांची मानसिक कुचंबणा होत आहे.
एकीकडे सर्व सुविधा सुरळीत असल्याचा दावा विभाग नियंत्रक (राज्य परिवहन, बीड) अनुजा दुसाने यांनी केला असला तरी प्रत्यक्ष स्थिती मात्र पूर्णतः विपरीत असल्याचे दिसून येते. संबंधित प्रकरणात अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असून कंत्राटदारांना पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोपही होत आहे.
या सर्व बाबींवर तातडीने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी, बीड यांच्याकडे केली आहे.
डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२
Back to top button