बीड
लाखो रुपये खर्चून उभारलेली मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालये बेवारस!

लाखो रुपये खर्चून उभारलेली मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालये बेवारस!
शासनाने कार्यालये बांधली; मंडळ अधिकारी, तलाठ्यांनी थाटली खासगी कार्यालये
गेवराई (सूर्योदय न्यूज)
ग्रामीण भागातील शेतकरी, सामान्य नागरिक, वृद्ध, विद्यार्थी यांची महसूलविषयक कामे गावपातळीवरच सुलभ व्हावीत, या उद्देशाने शासनाने सर्कलच्या गावांमध्ये लाखो रुपये खर्च करून मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयांच्या इमारती उभारल्या. मात्र, या इमारती उभारूनही संबंधित अधिकारी-कर्मचारी तेथे नियमितपणे कार्यालयीन कामकाज करत नसल्याचा आरोप होत असून, काही ठिकाणी खासगी जागेतून अथवा अन्य ठिकाणाहून कारभार सुरू असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा निधी अक्षरशः वाया जात असल्याची चर्चा ग्रामीण भागात सुरू आहे.
गेवराई तालुक्यातील तलवाडा येथेही मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यासाठी स्वतंत्र कार्यालयांची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, या कार्यालयांमध्ये नियमितपणे महसूलविषयक कामकाज होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. मंडळ अधिकारी ग्रामसचिवालयातील जागेतून, तर तलाठी एका खासगी मालकीच्या जागेतून कार्यालयीन कामकाज करत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शासनाने जनतेच्या सोयीसाठी लाखो रुपये खर्चून उभारलेल्या कार्यालयांचा उपयोग नेमका कशासाठी होत आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
महसूल प्रशासनातील महत्त्वाची कामे गावपातळीवरच उपलब्ध व्हावीत, यासाठी शासनाने ही कार्यालये उभारली आहेत. शेतकरी, विद्यार्थी, निराधार, ज्येष्ठ नागरिक तसेच सामान्य नागरिकांना विविध दाखले, प्रमाणपत्रे, सातबारा, फेरफार व अन्य महसूलविषयक कामांसाठी गावातूनच सेवा मिळणे अपेक्षित आहे. मात्र, संबंधित अधिकारी गावातील शासकीय कार्यालयात उपलब्ध नसल्यास नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी वारंवार चकरा माराव्या लागत असल्याने त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जात आहेत.
विशेष म्हणजे, काही ठिकाणी मंडळ अधिकारी व तलाठी तालुक्याच्या ठिकाणाहूनच कारभार हाकत असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे शासनाने उभारलेल्या कार्यालयांचा प्रत्यक्ष वापर होत आहे की नाही, संबंधित अधिकारी कार्यालयीन वेळेत कुठे उपस्थित असतात आणि नागरिकांची कामे नेमकी कुठे केली जातात, याची वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
शासनाचा निधी खर्च करून उभारलेल्या कार्यालयांचा उपयोग जनतेच्या सेवेसाठीच झाला पाहिजे. त्यामुळे तलवाड्यासह तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयांची तहसीलदार अथवा जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती तपासावी आणि संबंधित अधिकारी-कर्मचारी शासकीय कार्यालयात नियमित उपस्थित राहतात की नाही, याची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
Writing
वरिष्ठ अधिकाऱ्यांची अचानक तपासणी करण्याची गरज
गावोगावी असलेल्या मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयांची जिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी अचानक पाहणी करण्याची गरज आहे. कार्यालयीन वेळेत संबंधित अधिकारी-कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित आहेत का, नागरिकांची कामे कुठे व कशी केली जातात, तसेच शासनाने उभारलेल्या कार्यालयांचा प्रत्यक्ष वापर होतो का, याची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
केवळ कागदोपत्री कार्यालये अस्तित्वात असल्याचे दाखवून उपयोग नाही. शासनाने जनतेच्या पैशातून उभारलेली कार्यालये प्रत्यक्षात नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत की नाहीत, हे तपासणे आवश्यक आहे. महसूल प्रशासनाचा कारभार हा नागरिकांच्या सोयीसाठी असतो; अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी नव्हे, याची जाणीव संबंधितांना करून देण्याची मागणी ग्रामीण भागातून होत आहे.



