बीड

प्रशासनाच्या हलगर्जीने तलाव वाचेल का? पाणी टिकवण्यासाठी ग्रामस्थांची तहसीलदारांकडे मागणी

प्रशासनाच्या हलगर्जीने तलाव वाचेल का? पाणी टिकवण्यासाठी ग्रामस्थांची तहसीलदारांकडे मागण

पिंपळगाव (आळवा) तलावात अनधिकृत पाणी उपशावर कारवाई

जामखेड, दि. २ मे –
पिंपळगाव (आळवा) ता. जामखेड येथील लघुपाटबंधारे तलावातून अनधिकृत पद्धतीने होणाऱ्या पाणी उपशावर काल (३० एप्रिल) सायंकाळी ६:३० वाजता संयुक्त कारवाई करण्यात आली. शाखाधिकारी श्री. ओव्हळ, बीडधारक श्री. आंधळे, महावितरणचे अधिकारी श्री. कांडेकर तसेच महसूल अधिकारी श्री. कारंडे यांच्या पथकाने या कारवाईदरम्यान तलाव परिसराची पाहणी केली.

या वेळी अनधिकृत विद्युत वाहक कंडक्टर तपासण्यात आले. काही केबल, स्टार्टर पेटी व साहित्य जप्त करण्यात आले, मात्र मोटार आणि पाईप मात्र घटनास्थळीच सोडण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर आहे.

या तलावातील पाणी दिनांक १५ एप्रिल रोजीच शासकीयरित्या अधिग्रहित करण्यात आले होते. तरीही काही ठराविक मोटार पंपच हटवले गेले आणि त्यानंतर प्रशासनाने पाठपुरावा न केल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे कारवाई केवळ कागदोपत्री झाल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

प्रांताधिकारी मा. नितीन पाटील यांच्या सूचनेनंतर ही कारवाई झाली असली, तरीही अनेक अनधिकृत साधने शिल्लक असल्याचे निदर्शनास आले आहे.घोडेगाव, सारोळा आणि पिंपळगाव (आळवा) या गावांना पाणी पुरवठ्याच्या पाईप लाईन या तलावातून आहेत.

सध्या उष्णतेची तीव्र लाट सुरू असून, पाण्याचा तुटवडा भासू लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळा लांबला तर दुष्काळाचे संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर, मा. तहसीलदार श्री. गणेश माळी यांनी यामध्ये स्वतः लक्ष घालावे व शिल्लक पाण्याचा योग्य नियोजनानुसार वापर व्हावा, अशी मागणी घोडेगाव ग्रामस्थांनी केली आहे.

Back to top button