घोडेगावच्या विकासासाठी सभापती प्रा. राम शिंदे आणि सरपंच शरद जगताप यांची महत्त्वपूर्ण चर्चा

घोडेगावच्या विकासासाठी सभापती प्रा. राम शिंदे आणि सरपंच शरद जगताप यांची महत्त्वपूर्ण चर्चा
जामखेड (घोडेगाव), १९ एप्रिल:विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि घोडेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच शरद जगताप यांच्यात आज चौंडी येथे झालेल्या बैठकीत घोडेगावच्या सर्वांगीण विकासावर सखोल चर्चा करण्यात आली.
या बैठकीत गावाच्या पायाभूत सुविधांबाबत विविध मागण्या करण्यात आल्या. सरपंच शरद जगताप यांनी घोडेगाव बसस्थानक ते होळी चौक सिमेंट रस्ता (१५ लाख), शिवछत्रपती महाराज चौक येथे पेव्हर ब्लॉक बसविणे (१५ लाख), तसेच जीर्ण झालेल्या ग्रामसचिवालयाच्या जागी नविन प्रशस्त इमारत उभारण्यासाठी ( २० लाख) निधीची मागणी केली.
तसेच, मौजे घोडेगाव ते नान्नज रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ अंतर्गत सुरू असलेले रस्त्याचे काम सुरू आहे. परंतु पूर्वी बांधलेला ८०० मीटरचा रस्ता निकृष्ट अवस्थेत असून, त्यासाठी दुसरी लेअर आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. सद्य:स्थितीत काम करणाऱ्या एजन्सींना अतिरिक्त निधी उपलब्ध करून हा रस्ता पुन्हा दुरुस्त करण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली.
याशिवाय, जल जीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना झाली असून काही वस्त्यांमध्ये कामे झाली नाहीत त्यासाठी वाढीव निधी उपलब्ध करुन उर्वरित वस्त्यांमध्ये कामे सुरू करावी.तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन मंजूर असून प्रशासनाच्या पातळीवर निविदा काढून गती देण्यात यावी.अशा अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांसाठीही सरकारकडून सहकार्याची मागणी केली गेली.
या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देत प्रा. राम शिंदे यांनी सांगितले की, “राज्य सरकार घोडेगावच्या विकासासाठी वचनबद्ध असून ग्रामपंचायतीला सर्वतोपरी मदत केली जाईल.”
यावेळी उपसरपंच अकबर मुलाणे, लक्ष्मण भांगे, धनेश कांबळे, राम भोंडवे, ज्ञानदेव भोंडवे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
*प्रतिक्रिया*
घोडेगावच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही विविध विकासकामांच्या प्रस्तावांसह राज्य सरकारकडे निधीची मागणी केली आहे. ग्रामसचिवालयासारख्या सुविधा अत्यंत गरजेच्या असून, त्यासाठी त्वरित पावले उचलली पाहिजेत.”
*शरद जगताप*
सरपंच – ग्रामपंचायत, घोडेगाव



