मराठवाडा पदवीधर निवडणुकीत डॉ. प्रतापसिंह पाटलांचा विजय निश्चित! – राजेंद्र मस्के

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत डॉ. प्रतापसिंह पाटलांचा विजय निश्चित! – राजेंद्र मस्के
तालुकाध्यक्ष थेट मतदार संपर्क मोहीम राबवणार!
बीड, प्रतिनिधी :राज्यातील पेपरफुटी प्रकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक आणि सुशिक्षित वर्गामध्ये सरकारविषयी नाराजी असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी ठाम विश्वास व्यक्त केला.
मराठवाडा विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या अध्यक्षतेखाली सर्व तालुकाध्यक्षांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत निवडणूक प्रचाराचे नियोजन, पदवीधर मतदारांशी थेट संपर्क आणि संघटनात्मक पातळीवर प्रचार अधिक गतिमान करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीस केजचे शंकर जाधव, वडवणीचे महादेव जमाले, परळीचे बाबासाहेब शिंदे, पाटोद्याचे आनंद जाधव, गेवराईचे राजेंद्र मोटे, शिरूरचे जालिंदर थिटे, धारूरचे युवराज लगड, अखिलभाई यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
महाविकास आघाडीचे पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी सर्व तालुकाध्यक्ष आणि पदाधिकारी सक्रिय झाले आहेत. पदवीधर मतदारांशी थेट संवाद साधून त्यांच्या प्रश्नांची माहिती घेणे, उमेदवाराची भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचविणे आणि मतदारांशी संपर्क अधिक दृढ करणे, यासाठी तालुकानिहाय संपर्क मोहीम राबविण्यात येणार आहे.
दरम्यान, महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार यांच्या जिल्ह्यातील विकासकामांतील योगदान आणि जनसंपर्का बाबत राजेंद्र मस्के यांनी प्रश्न उपस्थित केले. जिल्ह्यातील काही मतदारांमध्ये या मुद्द्यांवर नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. प्रतापसिंह पाटील यांना पदवीधर मतदारांकडून प्रथम पसंती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सर्व तालुकाध्यक्षांना सक्रिय करून थेट मतदार संपर्क मोहिमेला गती देण्याचा निर्धार या आढावा बैठकीत व्यक्त करण्यात आला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या प्रचारयंत्रणेने संघटनात्मक तयारीवर भर दिला आहे.



