परळीत आचारसंहितेचा भंग? पद्मश्री धर्माधिकारी यांच्या पोस्टरवरून राजकीय वातावरण तापले!

परळीत आचारसंहितेचा भंग? पद्मश्री धर्माधिकारी यांच्या पोस्टरवरून राजकीय वातावरण तापले!
अमर रोडे यांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक, कारवाईकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष!
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : परळी शहरात व संपूर्ण मराठवाड्यात पदवीधर निवडणुकीमुळे आदर्श आचारसंहिता लागू असताना नगराध्यक्ष पद्मिनी बाजीराव धर्माधिकारी यांच्या नावाचे पोस्टर, बॅनर आणि फलक शहरभर झळकत असल्याचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. या प्रकारामुळे आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सचीव अमर रोडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याप्रकरणी त्यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली असून, पोस्टरचे छायाचित्ररूपी पुरावेही सादर केल्याचे सांगितले आहे.
आचारसंहिता लागू असताना शहरभर पोस्टर कसे?
निवडणुकीच्या काळात आदर्श आचारसंहितेचे पालन करणे सर्व संबंधितांसाठी आवश्यक असते. अशा परिस्थितीत परळी शहरात राजकीय प्रसिद्धी करणारे पोस्टर आणि फलक लावण्यास परवानगी देण्यात आली आहे का? संबंधित प्रसिद्धी नियमानुसार आहे का? तसेच या पोस्टरबाबत निवडणूक प्रशासनाने कोणती भूमिका घेतली आहे? असे सवाल अमर रोडे यांनी उपस्थित केले आहेत.
आचारसंहिता लागू असताना राजकीय प्रसिद्धीच्या माध्यमातून नियमांचे उल्लंघन होत असेल, तर त्याची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवडणूक प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष!
या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आल्याने आता प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी आणि तालुका निवडणूक अधिकारी या प्रकरणाची दखल घेणार का? संबंधित पोस्टर लावण्यास परवानगी होती का, याची तपासणी होणार का? आणि आचारसंहितेचे उल्लंघन आढळल्यास कारवाई केली जाणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
तक्रारीवर कारवाई होणार की प्रकरणाकडे दुर्लक्ष?
निवडणूक काळात आचारसंहितेची अंमलबजावणी निष्पक्ष आणि समान पद्धतीने होणे अपेक्षित आहे. त्यामुळे अमर रोडे यांनी दिलेल्या तक्रारीची प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेऊन वस्तुस्थिती तपासावी, अशी मागणी पुढे आली आहे.
परळीतील या पोस्टर प्रकरणामुळे निवडणूक प्रशासनाच्या कार्यपद्धतीची कसोटी लागली असून, तक्रारीनंतर नेमकी कोणती कारवाई होते, याकडे केवळ परळीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पोस्टर लावण्यामागील परिस्थिती, त्यासाठी घेतलेली परवानगी आणि आचारसंहितेचा भंग झाला आहे किंवा नाही, याबाबत निवडणूक प्रशासनाची अधिकृत भूमिका समोर आल्यानंतरच या प्रकरणाचे चित्र स्पष्ट होणार आहे. यावेळी उपस्थित परळी नगरसेवक कादरभाई कुरेशी शरद पवार गटांचे युवक शहराध्यक्ष सय्यद फिरोज राज हजारे उप्पाध्यक्ष
सनी कसबे सरचिटणीस
शेख कैफ अल्पसंख्या सरचिटणीस मुस्तफा शेख
अल्पसंख्यक उपाध्यक्ष शहर
आदी उपस्थित होते.



