बीड

जामखेडमधील NH ५४८ डी चे काम निकृष्ट, डिव्हायडरमध्ये चुकीच्या पद्धतीने विद्युत खांब

जामखेडमधील NH ५४८ डी चे काम निकृष्ट, डिव्हायडरमध्ये चुकीच्या पद्धतीने विद्युत खांब

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आक्रमक, तहसीलदारांना निवेदन

जामखेड प्रतिनिधी: जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ डी चे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे व नियोजनशून्य पद्धतीने सुरू असल्याचा आरोप करत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, जामखेडच्या वतीने आज तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

श्री शिवप्रतिष्ठानचे तालुका प्रमुख पांडुरंग भोसले यांनी निवेदनात म्हटले आहे की, गेली तीन वर्षे ठेकेदाराकडून नागरिकांना त्रास होईल अशाच पद्धतीने काम सुरू आहे. रस्त्याचे काम अत्यंत खालच्या दर्जाचे झाले असून रस्त्याच्या दुतर्फा बांधलेली गटारे एकसमान पातळीत नाहीत. ठिकठिकाणी गटारे वर-खाली असल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होणार नाही तसेच, राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यभागी अनेक विद्युत खांब जैसे थे ठेवण्यात आले आहेत.

यामुळे आजपर्यंत अनेक अपघात घडले असून प्रवाशांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. सध्या डिव्हायडरचे बांधकाम पूर्ण होण्याआधीच त्यामध्ये विद्युत खांबांसाठी खड्डे खोदले जात आहेत, ही पद्धत पूर्णपणे चुकीची व धोकादायक आहे, असे निवेदनात नमूद आहे या गंभीर विषयावर आम्ही यापूर्वी अनेक वेळा लेखी निवेदन दिले आहे.

मा. जिल्हाधिकारी यांनी मा. उपविभागीय अधिकारी, कर्जत यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने बैठक घेण्याचे आदेश दिले होते. परंतु आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही,असे पांडुरंग भोसले यांनी सांगितले.

डिव्हायडरचे काम पूर्ण झाल्याशिवाय विद्युत खांब बसवण्याचे काम तात्काळ थांबवावे.
रस्ता व गटारांच्या निकृष्ट कामाची तांत्रिक तपासणी करून संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी.
पूर्वीच्या निवेदनांवर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल व बैठकीचे इतिवृत्त उपलब्ध करून द्यावे यावेळी निवेदन देताना पांडुरंग भोसले, जगन्नाथ म्हेत्रे, भाऊ पोटफोडे, उमेश राळेभात, किरण राऊत, बंटी पाटील, सागर गायकवाड, सागर घुमरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button