संपादकीय

इंदूमिल मधील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाची गती राज्य सरकारने वाढवावी

मुंबई | दादरच्या इंदूमिल मधील साडेबारा एकर जागेवर बांधण्यात येत असलेल्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाचे बांधकाम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. यासंदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने दखल घेण्यात आली असून पक्षाचे राष्ट्रीय सचिव दयाल बहादुरे यांनी ६ डिसेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी स्मारकाच्या ठिकाणी भेट देऊन बांधकामाची पाहणी केली असता फक्त तीस टक्केच काम पूर्ण झाल्याचे दिसून आले आहे त्यामुळे कामाची गती वाढविणे आवश्यक आहे यासाठी रिपब्लिकन पक्षाचे शिष्टमंडळ लवकरच महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन बांधकामाची गती वाढवण्याची मागणी करणार आहे.

स्मारकाच्या बांधकामाची पाहणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सचिव दयाल बहादुरे ,पँथर नेते ऍड कीर्ती ढोले, ऍड संजय शंभरकर, मुंबईजिल्हा अध्यक्ष विवेक पवार, तन्मय बहादुरे, फोटोग्राफर देवेंद्र रणपिसे यांनी केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या चबुतऱ्यांची उंची १०० फूट असणार आहे त्यापैकी ३० फुटाचे काम पूर्ण झालेले आहे अजून ७० फूट उंचीचे काम बाकी आहे १०० फूट चंबूतऱ्यांच्या उंचीचे काम पूर्ण झाल्यावर ३५० फुटाचा बाबासाहेब आंबेडकरांचा ब्रांच धातूचा पुतळा बसविण्यात येणार असून पुतळ्याचे तोंड समुद्राच्या दिशेने असणार आहे. पुतळा बनवण्याचे काम अगोदर चायनाच्या एका कंपनीला देण्यात आले होते परंतु चायना सोबत भारत देशाचे संबंध सध्या चांगले नसल्यामुळे पुतळा बनवण्याच्या कामात उशीर होत असल्याने पूर्णपणे देशी बनावटीच्या पुतळा बनवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे.

तसेच चबुतरा व पुतळा या दोन्हीची उंची एकत्र धरून एकूण ४५० फूट उंचीचा पुतळा असणार आहे. म्हणजेच ४५ माळ्याच्या इमारती एवढी पुतळ्याची एकूण उंची असणार आहे. १००० लोक बसू शकतील एवढा मोठा हॉल व ५०० गाड्याची पार्किंग असलेले अंडरग्राउंड काम पूर्णत्वास होत आलेले आहे. स्मारकाचे प्रवेशद्वार हे चैत्यभूमी स्मारकाच्या मागील बाजूने असणार असून स्मारकात तथागत गौतम बुद्धाची १७ फुटाची मूर्ती स्वतंत्रपणे चांगल्या ठिकाणी बसविण्यात येणार आहे. स्मारकाच्या बांधकामाचा एकूण खर्च १०८० कोटी रुपये होणार असून २०२४ पर्यंत स्मारकाचे बांधकाम पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. बांधकामासाठी एमएमआरडीए ही सरकारी नोडल एजन्सी असून शापुरजी पालमजी या कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून बांधकाम करण्यात येत आहे समंधीत माहिती कंपनी च्या प्रोजेक्ट मॅनेजर कडून देण्यात आली आहे.

Back to top button